राहुरी वेब प्रतिनिधी : शुक्रवार (२५ सप्टेंबर) रोजी होणारी गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त करावी, अशी मागणी राहुरी येथील ज्येष्ठ नागरिक संघ (गाडगे महाराज) यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार डॉक्टर अमित पवार व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तथा सेवानिवृत्त फौजदार एम. एम. पाचारणे, जगन्नाथ खंडू काळे, राधाकृष्ण देवरे, चंद्रकांत धोंगडे, गोरक्षनाथ सिन्नरकर आदींनी राहुरी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण तसेच महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून राहुरीतील गणेश विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त करण्यात याव्यात. यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.