अहिल्यानगर : बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढते वजन तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. एकेकाळी श्रीमंतांचा खर्चिक आजार म्हणून ओळखला जाणारा हृदयविकार आता मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही वाढत असल्याने ही बाब वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन अश्विन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या शरीरक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी केले.
११व्या राष्ट्रीय आयुर्वेदिक दिनानिमित्त राम रामेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. आलिशा पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहा आंधळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राकेश पवार, डॉ. राहुल खेत्री, डॉ. दिपाली शिंदे आणि डॉ. विद्या भोसले उपस्थित होते.
डॉ. गिरगुणे म्हणाले, “हृदयविकारामागे अनेक कारणे असली तरी मानसिक ताणतणाव हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. राग, अहंकार, सततची स्पर्धात्मक वृत्ती, चिंता, क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याची सवय, अतिमहत्त्वाकांक्षा, नैराश्य, अनुवंशिकता, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.”
भारतीयांची शरीररचना, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांची अरुंदता यांचा विचार करून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उंचीनुसार योग्य वजन राखावे. आपण काय खातो आणि किती खातो, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार खाण्याची सवय टाळावी. दैनंदिन आहारात नैसर्गिक व कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश करावा. तेल, तूप, फास्ट फूड आणि दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन टाळावे, असेही त्यांनी सांगितले.
दररोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. कामाच्या ठिकाणी आनंदी व तणावरहित वातावरण ठेवावे. जवळच्या व्यक्तींशी प्रेमाने वागावे आणि विनोदबुद्धीचा वापर करावा. मनःशांतीसाठी अध्यात्माचा आधार घेतल्यास वर्तमानात जगण्यास मदत होते. हरिपाठ, श्रीराम विजय, तुकाराम गाथा, भगवद्गीता तसेच आपल्या धर्मानुसार धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, असे आवाहन डॉ. गिरगुणे यांनी केले.
यावेळी डॉ. आलिशा पाटील आणि डॉ. प्रसाद मुसमाडे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रीदा खान यांनी केले. डॉ. भागवत जाधव, डॉ. दाभाडे, डॉ. श्रावणी वसूलकर, डॉ. आदित्य अवचट, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. राहुल सरकटे आणि डॉ. वैष्णवी बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. दिनेश परसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.