आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देणार : आमदार अक्षय कर्डिले

कापूरवाडीत ‘सेवासेतू’ कार्यक्रम; पात्र लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ देण्याचे आश्वासन

कापूरवाडी : आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना गती मिळावी, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सेवासंकल्प अभियानांतर्गत सेवासेतू’ कार्यक्रम कापूरवाडी येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना आमदार अक्षय कर्डिले यांनी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

आदिवासी समाज कोणत्याही शासकीय सेवेपासून वंचित राहणार नाही. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी थेट कापूरवाडीत उपस्थित असून, आजपासूनच कामाला सुरुवात होईल. पुढील सेवासेतू कार्यक्रम केवळ माहिती देण्यासाठी नव्हे, तर पात्र लाभार्थ्यांना थेट दाखले वाटप करण्यासाठी आयोजित केला जाईल, असे कर्डिले यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने सेवासंकल्प अभियान राबविण्यात येत असून, या माध्यमातून शासनाच्या विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आदिवासी समाज हा समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, या समाजाने कायम साथ दिली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या अडचणी सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही शासकीय कामासाठी आदिवासी बांधवांना वणवण फिरण्याची वेळ येऊ देणार नाही. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

कापूरवाडी परिसरातील पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून घरकुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी आदिवासी बांधवांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले कुटुंबीयांच्या पाठीशी कायम राहण्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमात शिष्यवृत्ती, वसतिगृह, शबरी आदिवासी घरकुल योजना, वनहक्क अधिनियम, आदिवासी वस्ती सुधारणा, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, सिकलसेल आजार, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य व शिक्षण आदी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबतही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले

‘सेवासेतू’च्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यात थेट संवाद घडून आला. नागरिकांनी आपल्या विविध समस्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर मांडल्या. प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे कापूरवाडी परिसरातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *