राहुरी, प्रतिनिधी शरद पाचारणे ,ता. ७ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाच्या सवलतीची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुरी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन सोमवारी (७ सप्टेंबर) तहसीलदार डॉ. अमित पवार यांना देण्यात आले.
निवेदनात धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. धनगर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली विशेष अनुज्ञा याचिका महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकदीने व गांभीर्याने लढवावी. तसेच ८ सप्टेंबरपूर्वी धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करून सर्वोच्च न्यायालयात धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडावी. तसेच एसटी आरक्षणाबाबत प्रतिकूल निर्णय झाल्यास धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने पर्यायी कृती आराखडा (प्लॅन बी) तयार ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र शासकीय कायदा करावा, देवस्थानच्या विश्वस्त मंडळात किमान २१ विश्वस्त असावेत आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे. तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करावे, अशीही मागणी करण्यात आली.
धनगर जमातीच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर, मेंढपाळांचे नेते कोंडीरामजी बाचकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक कैलासजी केसकर, अनिल डोलनर, दत्ताभाऊ बाचकर, भाऊसाहेब शिंदे, दिलीप खडके, गणेश तमनर, श्रीकांत तमनर, सतीश बाचकर, बापूसाहेब तमनर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.