अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपुरात रात्रीची धडक कारवाई

श्रीरामपूर प्रतिनिधी :

श्रीरामपूर शहरातील मोकळ्या मैदानांवर रात्रीच्या वेळी बसून मद्यपान करणाऱ्या तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्या तरुणांविरोधात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पुढाकाराने धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सुमारे ३२ वाहने व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पूर्ण ब्लॅक फिल्म लावलेल्या दोन चारचाकी वाहनांवरही कारवाई करण्यात आली.

मंगळवारी रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक तसेच आरसीपी पथकाने शहरातील थत्ते मैदान आणि महाले-पोद्दार शाळेसमोरील क्रिकेट मैदानावर अचानक तपासणी केली.

तपासणीदरम्यान मैदान परिसरात रिकाम्या बसून गप्पा मारणारे तसेच मद्यपान करत असलेले काही तरुण आढळून आले. विशेष म्हणजे, श्रीरामपूर शहरासह गोंधवणी परिसर व अन्य बाहेरील भागातील काही तरुणही या मैदानांवर येत असल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान, थत्ते मैदान परिसरात आढळून आलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा पूर्णपणे ब्लॅक फिल्मने झाकलेल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.

रात्रीच्या वेळी कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मैदान परिसरात होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे त्रास सहन करावा लागत होता. याबाबत परिसरातील नागरिकांकडून तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पुढाकार घेत ही विशेष तपासणी मोहीम राबविली.

अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईचे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शहरातील सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी अशी मोहीम नियमितपणे राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *