मिरीतील धोकादायक अंगणवाडी इमारतीची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली पाहणी

करंजी (प्रतिनिधी) : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील झोपडपट्टी परिसरातील अंगणवाडी क्र. ६ ची इमारत धोकादायक झाल्याने चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी (दि. २६) अंगणवाडीला भेट देऊन इमारतीची पाहणी केली.

मिरी येथील झोपडपट्टी परिसरातील अंगणवाडीची इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून, चिमुकल्यांना लिंबाच्या झाडाखाली अक्षर गिरवावी लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार तनपुरे यांनी तत्काळ दखल घेतली. प्रशासनाने या इमारतीच्या निल ेखनाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी तीन दिवसांपूर्वीच पत्राद्वारे दिल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी आमदार तनपुरे यांनी अचानक अंगणवाडीला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अंगणवाडीच्या नवीन इमारतीसह झोपडपट्टी परिसरातील रस्ते आणि पथदिव्यांसाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार तनपुरे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून अंगणवाडीच्या इमारतीसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच उपस्थित ग्रामस्थ व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र तागड, भागिनाथ गवळी, राजू शेख, जगदीश शेलाट, बंडू झाडे, बाबासाहेब निर्मळ, मयूर तागड यांच्यासह अंगणवाडी सेविका शोभा तुपे, मदतनीस तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

धोकादायक इमारतीत अंगणवाडी सुरू ठेवण्याऐवजी नवीन इमारतीची तातडीने व्यवस्था करण्याची गरज असून, आमदार तनपुरे यांच्या पाहणीमुळे या प्रश्नाला गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *