देसवंडी पॅटर्न पुन्हा चर्चेत; शिक्षण, शेतकरी व निराधारांसाठी ऐतिहासिक निर्णय

देसवंडी: स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने १५ ऑगस्ट रोजी होणारी देसवंडी (ता. राहुरी) येथील ग्रामसभा यंदा २१ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत शिक्षण, शेतकरी, निराधार वयोवृद्ध, पर्यावरण संवर्धन तसेच ग्रामविकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामसभेतील अभिनव उपक्रमांमुळे ‘देसवंडी पॅटर्न’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सौ. योगिताताई नितीन कल्हापूरे होत्या. सचिव म्हणून संतोष तिकडे यांनी काम पाहिले. ग्रामसभेत रेल्वे भूसंपादन, घरकुल, पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, गावातील विकासकामे, आरोग्य समस्या आणि अतिक्रमणाचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली.

विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण गौरव करमाफी योजना’

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘शिक्षण गौरव करमाफी योजना’ सुरू करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदाता सन्मान योजना’

शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेत ‘अन्नदाता सन्मान योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या धर्तीवर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

निराधार कुटुंबांसाठी ‘आधारवड सन्मान योजना’

गावातील निराधार वयोवृद्ध तसेच कुटुंबाचा कर्ता पुरुष नसलेल्या किंवा उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ‘आधारवड सन्मान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा पात्र निराधार कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

‘एक व्यक्ती–एक वृक्ष’ उपक्रमाचा आढावा

वसुंधरा संवर्धनासाठी सुरू असलेल्या ‘एक व्यक्ती–एक वृक्ष’ या उपक्रमाचाही ग्रामसभेत आढावा घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, मागील ग्रामसभेत पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी प्रोत्साहन म्हणून ‘सरपंच-सुकन्या योजना’, ‘सरपंच-लेक लाडकी योजना’, ‘सरपंच-अमृतसरोवर योजना’ आणि ‘सरपंच-वैकुंठ गमन योजना’ यांसारख्या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली होती.

ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांचा तपशील ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात आला. गावातील अतिक्रमित जागा हटविण्याबाबतही ग्रामसभेत ठराव करण्यात आला. नवीन घरकुल, पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा आणि विविध विकासकामांवर ग्रामस्थांनी मते मांडली.

यावेळी उपसरपंच सौ. वर्षा संदीप शिरसाठ यांच्या संकल्पनेतून आणि सौ. योगिताताई नितीन कल्हापूरे यांच्या प्रयत्नातून विविध लोकाभिमुख योजनांना चालना देण्यात आली. ग्रामसभेला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर पोलीस पाटील शिरसाठ, अंगणवाडी गटप्रमुख मेमाने मॅडम, आरोग्य अधिकारी डॉ. रेणुका रुपटक्के, सुभाष पवार, नितीन कल्हापूरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कल्हापूरे, कुलदीप शिरसाठ, प्रकाश शिरसाठ यांच्यासह सुनील बोर्डे, रवी बोर्डे, बाबासाहेब कोकाटे, अनिकेत कोकाटे, चंद्रकांत गागरे, रवींद्र पवार, राहुल पवार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *