वाळुंज बायपासवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ‘गोव्यात विक्रीसाठी’ असलेली तब्बल 26.77 लाखांची दारू जप्त

अहिल्यानगर : गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली मद्याची मोठी खेप बेकायदेशीररीत्या वाहतूक करून करमाळ्याकडे नेली जात असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने वाळुंज बायपास येथे सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत आयशर टेम्पोसह विविध ब्रँडची दारू आणि मोबाईल असा एकूण 26 लाख 77 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुरुवारी (दि. 20 ऑगस्ट) गोपनीय बातमीदारामार्फत आयशर टेम्पो क्रमांक एमएच-43-बीजी-7280 मधून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली दारू वाळुंज बायपासमार्गे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

पथकाने वाळुंज बायपास येथे पंचांसमक्ष सापळा रचला असता केडगावकडून संशयित आयशर टेम्पो येताना दिसला. पोलिसांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. चालकाकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने नितीन रमेश तांबसकर (वय 35, रा. टेंबवाडी, चराटे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेण्यात आले.

विविध ब्रँडच्या दारूचे शेकडो बॉक्स जप्त

पोलिसांनी केलेल्या तपासणीत रॉयल स्टॅग सुपीरियर व्हिस्कीचे 80 बॉक्स, इम्पेरियल ब्लू व्हिस्कीचे 97 बॉक्स, मॅकडॉल नं. 1 व्हिस्कीचे 49 बॉक्स, रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीचे तब्बल 398 बॉक्स तसेच एडरियल क्लासिक व्हिस्कीचे 20 बॉक्स असा मोठा साठा आढळून आला.

याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 26 लाख 77 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या दारूच्या प्रत्येक बॉक्सवर ‘FOR SALE IN GOA ONLY’ असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान आरोपीने हा मुद्देमाल शत्रुघ्न किरदक (रा. धाराशिव), प्रसाद सावंत (रा. खासकिलवाडा, ता. सावंतवाडी) तसेच त्यांच्या दोन साथीदारांच्या सांगण्यावरून बेकायदेशीररीत्या भरून करमाळा, जि. सोलापूरकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तान्हाजी देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 719/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीला जप्त मुद्देमालासह नगर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच संतोष खैरे, विजय ठोंबरे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भगवान थोरात, प्रशांत राठोड व सुनील मालणकर यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *