अहिल्यानगर : धनगरवाडी (ता. जि. अहिल्यानगर) येथे घरासमोर अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६४.७३ किलो वजनाची गांजाची झाडे, अंदाजे ३ लाख २३ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अनिल लक्ष्मण विरकर (वय ४९, रा. धनगरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना धनगरवाडी येथे गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका घरासमोर अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. या ठिकाणी राहणाऱ्या अनिल विरकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरासमोर लावलेली गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली. त्यांचे एकूण वजन ६४.७३ किलो असून किंमत ३ लाख २३ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम २०(अ), २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, अजय कौटे तसेच सफौ सुदाम लोंढे, पोहेकॉ सुशांत दिवटे, पोकॉ सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख, अक्षय रोहोकले यांच्या पथकाने केली.