अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड

अहिल्यानगर : शहरात अवैधरीत्या मावा, सुगंधित तंबाखू व गुटख्याची निर्मिती करून विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. २७) कारवाई केली. शहरातील दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मावा तयार करण्याच्या इलेक्ट्रीक मशीन, सुपारी बारीक करण्याची मशीन, सुगंधित तंबाखू, मावा, सुपारी, गुटखा यासह एकूण ४ लाख ३९ हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पाच जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी दोन पथके तयार केली होती. त्यानुसार पथकांनी शहरात माहिती घेत दोन ठिकाणी छापे टाकले.

पहिल्या कारवाईत आदेश किसन भिंगारदिवे (वय २३, रा. भिंगारदिवे मळा, गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याकडून इलेक्ट्रीक मशीन, वजन काटा, ९ किलो सुगंधित तंबाखू, ३ किलो मावा, गुटखा आदी ६६ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत कृष्णा यादव वैराळ (वय ३४), मोसीम रफिक शेख (वय ३८), वसीम रफिक शेख (वय ३२) यांच्यासह फरार असलेल्या राकेश सब्बन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत मावा बनविण्याची इलेक्ट्रीक मशीन, सुपारी बारीक करण्याची मशीन, ४० किलो मावा, १७ किलो सुगंधित तंबाखू, १२० किलो सुपारी, २५ किलो सुपारीचा चुरा असा ३ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३८/२०२६ व ७३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, विकास साळवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, शाहीद शेख, अभिजीत आरकल, सतीष भवर तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व सुनिता पवार यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *