राहुरी, प्रतिनिधी : राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे. आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास राहुरी पोलिसांकडून सुरू असून अद्याप आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोपीबाबत कोणतीही माहिती असल्यास पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
आरोपीबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असून माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे (मो. ८४२४०४२४४६) अथवा राहुरी पोलीस ठाणे (दूरध्वनी : ०२४२६-२३२४३३) येथे संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.