शेवगाव-पाथर्डीच्या दुष्काळी गावांना सिंचनाचा न्याय देणार; तिसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी ६३ लाखांचा निधी मंजूर – विखे पाटील
अहिल्यानगर : महायुती सरकारच्या माध्यमातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी गावांना सिंचनाचा न्याय देण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाकडून आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी आमदार मोनिका राजळे, अजय रक्ताटे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या पुनरुज्जीवनासाठी यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य कामांसाठी २० कोटी ८८ लाख रुपयांचा निधी, तर तिसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी ६३ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे २ हजार ७४४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच विस्तारित पहिल्या टप्प्यात १३ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टप्पा शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणार असून, वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४६ गावांच्या पाणीप्रश्नाबाबत नागपूर अधिवेशनादरम्यान विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासनही मंत्री विखे पाटील यांनी दिले.
शेवगाव येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न केले. प्रशासकीय स्तरावर अवघ्या काही महिन्यांत कार्यवाही सुरू झाली असून, योजनेचा तिसरा टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.