शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार; राहुरीत ७.५० कोटींचे नियोजन

आमदार अक्षय कर्डिले यांचे प्रशासनाला कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश

राहुरी (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी कायमस्वरूपी आणि बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला राहुरी विधानसभा मतदारसंघात गती देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले असून, शेतरस्त्यांची प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी प्रशासनाला दिले.

राहुरी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार कर्डिले यांनी महसूल, पोलीस, कृषी, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

गावोगावी असलेल्या पारंपरिक शेतरस्त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करून त्यांना स्वतंत्र क्रमांक देणे, गाव नकाशांमध्ये नोंदी करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्यक्रमानुसार रस्त्यांची यादी तयार करणे, तसेच अतिक्रमण असलेल्या रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करणे, अशा महत्त्वपूर्ण बाबींवर बैठकीत चर्चा झाली. आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्त्यांची मोजणी, तांत्रिक आराखडे, अंदाजपत्रके आणि प्रशासकीय मान्यता यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

केवळ कागदावर नियोजन नको, प्रत्यक्ष कामांना सुरुवात करा! असा स्पष्ट संदेश आमदार कर्डिले यांनी यावेळी दिला. प्रत्येक कामासाठी जबाबदार यंत्रणा निश्चित करून कामांचा दर्जा राखावा. कामापूर्वी आणि कामानंतरची छायाचित्रे व डिजिटल नोंदी ठेवाव्यात. तसेच शेतरस्त्यांच्या कडेला वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचेही त्यांनी सुचविले.

सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि शेतीसमोरील अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांअभावी त्रास सहन करावा लागू नये. शेतरस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत निष्पक्षपणे कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. या कामांमध्ये कोणत्याही स्तरावर दिरंगाई होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही आमदार कर्डिले यांनी केले.

या बैठकीस समितीचे सहअध्यक्ष वैभव खलाटे, उपविभागीय अधिकारी विनीत शिर्के, तहसीलदार डॉ. अमित पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, गटविकास अधिकारी मोहसीन शेख, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सय्यद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ, बाबासाहेब शिंदे, उमेश शेळके, कुलदीप पवार, अनिल पवार, माजी नगरसेवक अक्षय तनपुरे, मयूर गवळी, विश्वास तनपुरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *