अहिल्यानगर वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या सामाजिक बांधिलकीतून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, ॲनॉमली स्कॅन, रक्त तपासण्या, सामान्य प्रसूती, सिझेरियन तसेच कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, २डी इको आणि अँजिओग्राफीसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्यांचाही समावेश आहे. नेत्ररुग्णांसाठी मोतीबिंदूसह अन्य आवश्यक शस्त्रक्रिया, वीस वर्षांखालील मधुमेहग्रस्त रुग्णांना इन्सुलिन तसेच लहान मुलांसाठी आंतररुग्ण उपचारसेवाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सुपरस्पेशालिटी उपचारांसह जिल्ह्यात पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आल्याने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी झाली आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातूनही पात्र रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ दिला जात आहे.वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता गरजू रुग्णांच्या आरोग्याला आधार देणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हा उपक्रम निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.