ब्राम्हणीच्या जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक वॉटर फिल्टरची भेट

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. फायनान्स यांच्या सामाजिक बांधिलकीतून शाळेला अत्याधुनिक वॉटर फिल्टर मशीन भेट देण्यात आले.

या वॉटर फिल्टरचे उद्घाटन बुधवार (दि. २ सप्टेंबर) रोजी सरपंच सौ. सुवर्णा बानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. फायनान्सचे ज्ञानेश्वर कदम, रवींद्र रक्ताटे, प्रमोद गवांदे, संजय नांदवे, मयूर जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासत होती. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. फायनान्सने पुढाकार घेत अत्याधुनिक वॉटर फिल्टर मशीन उपलब्ध करून दिले.

पावसाळ्यात तसेच बदलत्या हवामानात दूषित पाण्यामुळे लहान मुलांना पोटाचे विकार व इतर आजार होण्याची शक्यता असते. नव्याने बसविण्यात आलेल्या फिल्टर प्रणालीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज जंतूमुक्त व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, संबंधित संस्थेकडे सातत्याने पत्रव्यवहार करून वॉटर फिल्टरसाठी केलेला शाळेचे मुख्याध्यापक साळाभाऊ नरवडे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. भौतिक सुविधांच्या बाबतीत ब्राम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहुरी तालुक्यात अग्रगण्य असून, शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“विद्यार्थ्यांचे आरोग्य हेच आमचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे,” असे मुख्याध्यापक साळाभाऊ नरवडे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. फायनान्सचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *