‘तुमच्या मतांची आम्हाला भीक नको’; धीरज परदेशी प्रकरणावरून आ. अक्षय कर्डिले आक्रमक

अहिल्यानगर : धीरज परदेशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात आमदार अक्षय कर्डिले यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपींना अटक होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही धरून आणू, असे सांगत त्यांनी पोलिस प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनाला राजकीय रंग देणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले.

धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आरोपींना तातडीने अटक करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना आ. कर्डिले म्हणाले, ‘‘धीरज परदेशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना गजाआड केले पाहिजे. आरोपी अटक होत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही धरून आणू.’’ संतापाच्या भरात त्यांनी आरोपींचे ‘मुंडके छाटले पाहिजे’ असे आक्रमक वक्तव्यही केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनातील संतापाची तीव्रता अधोरेखित झाली.

‘तुमचे मत तुमच्याजवळच ठेवा’

आंदोलनामागे राजकारण असल्याचा आरोप काहींकडून केला जात असल्याचे सांगत आ. कर्डिले यांनी हा आरोप फेटाळून लावला. ‘‘हे कुठलेही राजकारण नाही. तुम्हाला जर वाटत असेल की हे राजकारणासाठी सुरू आहे, तर तुमचे मत तुमच्याजवळच ठेवा. तुमचे मतही नको आम्हाला. तुमच्या मतांची आम्हाला भीक नको,’’ अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना सुनावले. तसेच, ‘‘तुम्हीही आमच्याकडे काम घेऊन येऊ नका,’’ असा थेट इशाराही त्यांनी दिला.

धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *