पारनेर दुष्काळमुक्तीसाठी जलसंपदा विभागाचा कृती आराखडा : ना.राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर, दि. ९ : 

कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महायुती सरकार प्रयत्नशील असून, राज्यातील दुष्काळ हा भूतकाळ ठरेल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा प्रारंभ जवळा येथे विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. आमदार काशिनाथ दाते, महायुतीचे पदाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. गांजी भोयरे येथे रस्ते विकासकामांचे लोकार्पणही करण्यात आले.

विखे पाटील म्हणाले, “पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू झाले आहे.” तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता होईल त्याप्रमाणे या योजना कार्यान्वित करून लाभक्षेत्रातील गावांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालव्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे कालव्यांचे संरक्षण होण्याबरोबरच पाण्याची गळती कमी होऊन वहन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवी संधी निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे ३२०० शेतकऱ्यांसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, पारनेर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेणे आवश्यक होते, असे मतही विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *