राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्यातून चोरीस गेलेला पितळी बुशचा संपूर्ण मुद्देमाल राहुरी पोलिसांनी १०० टक्के हस्तगत केला. या प्रकरणातील तीन फरार आरोपींना अवघ्या २४ तासांत श्रीरामपूर येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. एक आरोपी पोलिसांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घरातून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
प्रसाद साखर कारखाना, वांबोरी येथून पितळी बुश चोरीस गेल्याची फिर्याद बबन सिताराम पागिरे (रा. वांबोरी, ता. राहुरी) यांनी दिली होती. त्यावरून राहुरी पोलिस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले होते.
फरार आरोपींच्या शोधासाठी राहुरी पोलिसांचे पथक ८ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रवाना झाले. गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर परिसरात शोध घेतला असता सोएफ युनूस शहा (रा. वॉर्ड क्रमांक २), कैसर निसार शेख (रा. वॉर्ड क्रमांक १) आणि मुत्तबिर युसुफ शहा (रा. वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना राहुरी पोलिस ठाण्यात आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तपासादरम्यान चोरीस गेलेला संपूर्ण पितळी बुशचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दरम्यान, पोलिस आपला शोध घेत असल्याची माहिती मिळाल्याने आणखी एक आरोपी घरातून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, संजय राठोड, पोलिस शिपाई सतीश कुऱ्हाडे, प्रमोद ढाकणे व नदीम शेख यांनी सहभाग घेतला. तसेच श्रीरामपूर परिसरात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस हवालदार मनोज गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल बडे, वाघमारे व माने यांनी सहकार्य केले. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.