पारनेर, ता. ९ : अधिकारी निष्क्रिय झाले की जनतेच्या भावनांचा उद्रेक होतो. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
पारनेर येथे विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. आमदार काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते तसेच औद्योगिक वसाहतीशी संबंधित विविध प्रश्न मांडले. त्याची तत्काळ दखल घेत विखे पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. औद्योगिक वसाहतीतून तलावात सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवावा, असे त्यांनी सांगितले.
जामगावला तातडीने टँकर सुरू करण्याचे निर्देश
जामगाव येथे टँकरची मागणी असतानाही निर्णय होत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. याबाबत गटविकास अधिकारी सोनकुसळे यांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल विखे पाटील यांनी त्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. तसेच जामगावला तातडीने टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
शहरातील रस्त्यांची कामे दुभाजकासह पूर्ण करावीत. पावसामुळे रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सहा उपसा सिंचन योजनांना मंजुरी
तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांना जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असून, त्यापैकी तीन योजनांसाठी मुळा धरणातून पाणी उपलब्ध होत आहे. उर्वरित तीन योजनांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच चाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १०१ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वी तालुक्यात केवळ ‘खंडणीचे राजकारण’ होते. योजना केवळ कागदावर होत्या आणि बिले काढण्याचे काम झाले. आता परिस्थिती पूर्णपणे बदलत असून गुंडगिरी हद्दपार होऊन विकासकामांना गती मिळत आहे. आमदार दाते यांच्या माध्यमातून तालुक्यात आणखी मोठ्या प्रमाणात कामे होणार असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
आमदार काशिनाथ दाते यांनी अधिकाऱ्यांनी कामाबाबत गांभीर्य दाखवावे. नागरिकांना कामासाठी कार्यालयांच्या चकरा मारायला लावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वीज भारनियमनाचा प्रश्न मांडून तो सोडविण्याची विनंती त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.