कर्जमाफीची रक्कम परत गेल्याने आप्पासाहेब ढूस आक्रमक; आठ दिवसांचा अल्टिमेटम

देवळाली प्रवरा, ता. १० : देवळाली प्रवरा हद्दीतील शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीची सुमारे सहा कोटी रुपयांची रक्कम तांत्रिक कारणामुळे परत गेल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत वर्ग करावी; अन्यथा देवळाली प्रवरा सोसायटी तसेच शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

कर्जमाफीची रक्कम परत गेल्याची माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी देवळाली प्रवरा सोसायटीत जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. सोसायटीचे व्यवस्थापक चव्हाण यांच्याकडे कर्जमाफीच्या रकमेबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, झालेल्या प्रकारासाठी सोसायटी जबाबदार नसून वरच्या स्तरावरून तांत्रिक चूक झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

देवळाली प्रवरा सोसायटीच्या कर्जदार सभासदांच्या कर्जमाफीची रक्कम परत गेल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात इतर सोसायट्यांच्या तुलनेत केवळ देवळाली प्रवरा सोसायटीचीच कर्जमाफीची रक्कम परत का गेली, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

“शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालीच पाहिजे. तांत्रिक चूक कोणाचीही असो, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसता कामा नये. आठ दिवसांत रक्कम खात्यावर जमा झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरुण ढूस, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते दासूभाऊ पठारे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, माजी संचालक नानासाहेब कदम, दीपक पठारे, देवराम कडू आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *