राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : अहिल्यानगर-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नावर आगामी पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवून संबंधित प्रशासन व ठेकेदाराला जाब विचारावा, अशी मागणी ‘नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती’ने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महामार्गाच्या अपूर्ण व नियोजनशून्य कामामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी व कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
निवेदनात महामार्गाच्या कामातील अनेक त्रुटी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. मंजूर ३० मीटर रुंदीच्या जागेत प्रत्यक्षात केवळ ९ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येत असून, रस्त्यालगतच गटारी बांधल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे, असे समितीचे म्हणणे आहे.
राहुरी शहरात महामार्गाची उंची वाढविल्याने अंतर्गत रस्ते खाली गेले असून, पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे. तसेच दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) अत्यंत कमी रुंदीचे असल्याने रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका वाढणार असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. याशिवाय राहुरी येथील सूतगिरणीसमोरील कलव्हर्टचे काम अवघ्या महिनाभरापूर्वी पूर्ण झाले असतानाच तेथे मोठे भगदाड पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरी भागातील गटारी रस्त्यापासून किमान १५ मीटर अंतरावर हलवाव्यात, तसेच संपूर्ण महामार्गाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या समितीने केल्या आहेत. आगामी अधिवेशनात हा विषय प्रभावीपणे मांडून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली आहे.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यासह नवनीत दरक, संतोष भुजाडी, संदीप गाडे, जनार्धन म्हसे, प्रितेश तनपुरे आणि सतीश घुले उपस्थित होते.