सोमनाथ वाघचौरे यांची धडक कारवाई; अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एका डॉक्टरची अटक

श्रीरामपूर : लोणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी एका डॉक्टरला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील डॉक्टर ज्ञानेश्वर नायकोडी यांना अटक करण्यात आली असून या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आठ डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून विविध जिल्ह्यांतील डॉक्टर, मेडिकल चालक आणि एजंट यांचा सहभाग उघड होत आहे. अटक आरोपींकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान शिरूर (जि. पुणे) येथील डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय ५४, बीएएमएस) यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. आज त्यांना राहता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांकडून आता डॉ. नायकोडी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाणार असून त्यांच्याकडे गर्भवती महिलांना कोण पाठवत होते, या रॅकेटमध्ये कोणते एजंट कार्यरत होते, तसेच आतापर्यंत किती महिलांच्या गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात करण्यात आले, याचा तपास केला जाणार आहे.

या प्रकरणात आतापर्यंत २४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये आठ डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या पुरवठादाराचा समावेश आहे. तपासादरम्यान विविध जिल्ह्यांतून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी सहा सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भारती आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *