जयभीम मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार;उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती

राहुरी : येथील जय भीम मित्र मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी, शैक्षणिक नियोजन तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक योगेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, बचत खाते, शिष्यवृत्ती आणि बँकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, सामाजिक कार्यकर्ते सागर साळवे, पिंटू साळवे तसेच राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर मात करून यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.

कार्यक्रमास प्रदीप हिवाळे, किरण साळवे, नवीन साळवे, दादू साळवे, दीपक साळवे, पंची साळवे, अजय साळवे, सौ. भारती साळवे, संगीता साळवे, नीता साळवे, मंदाकिनी साळवे आदी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेणुका साळवे-रुपटक्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *