राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त विराज धसाळ यांचा जनहिताचा उपक्रम

तांदुळवाडी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त ग्रामपंचायत तांदुळवाडी येथे विविध शासकीय योजनांसाठी लोकोपयोगी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

ग्रामपंचायत तांदुळवाडीचे सरपंच विराज दादा धसाळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एसटी कार्ड (NCMC), आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती व अपडेट, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान केवायसी, संजय गांधी योजना केवायसी, मतदान ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती, बांधकाम कामगार योजना नोंदणी व नूतनीकरण, वयोश्री सहाय्यक साधने योजना, दिव्यांग सहाय्यक साधने योजना तसेच निरामय विमा योजनेसह विविध शासकीय योजनांची कामे एकाच ठिकाणी करण्यात आली.

सामान्य नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. मात्र या शिबिरामुळे ग्रामस्थांची ही गैरसोय टळली असून गावातच विविध सेवांचा लाभ उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांची प्रलंबित कामे मार्गी लागली. ग्रामस्थांनी सरपंच विराज धसाळ यांचे आभार मानत अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *