राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे- राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन आपली अडचण मांडली. विद्युत मोटारी पूर्णपणे बंद झाल्यास पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यानंतर आमदार कर्डिले यांनी तातडीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली.
आमदार कर्डिले यांच्या पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरण प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या गरजा भागविण्यासाठी दिवसआड दोन तास विद्युत मोटारी सुरू ठेवण्यास मुळा धरण प्रशासनाने परवानगी दिली.
या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता कायम राहणार असल्याने पशुपालकांनाही मोठा आधार मिळाला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणीची तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचे विशेष आभार मानले. तसेच सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.