नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले उद्या विधानभवनात शपथविधी

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी ठरलेले नवनिर्वाचित आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले उद्या मुंबईतील विधानभवन येथे आमदारपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीकडे संपूर्ण राहुरी मतदारसंघाचे लक्ष लागले असून, मतदारसंघाच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडणारे कर्डिले यांनी ‘जनता दरबार’ उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पाणी, वीज, रस्ते, महसूल, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध विषयांवरील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच पोटनिवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भरघोस मतांनी विधानसभेत पाठविले.

शपथविधीनंतर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, विकासकामांना गती देणे आणि नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना करणे यावर भर राहणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. उद्याचा शपथविधी हा केवळ एका आमदाराचा नसून राहुरीच्या विकासाच्या नव्या संकल्पनेचा प्रारंभ असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

कर्डिले म्हणाले, ‘‘राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला विश्वास आणि आशीर्वाद यामुळेच विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले, त्याच विचारांचा वारसा पुढे नेत प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध राहणार आहे. संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी आता माझी असून हा मतदारसंघच माझे कुटुंब आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करणार आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *