राहुरी, वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी तालुक्यातील सोनगाव साकळ शिवारात अवैधरित्या साठवून ठेवलेला रेशनिंगचा गहू व तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या कारवाईत सुमारे १२ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सोनगाव सात्रळ परिसरात रेशनिंगचा धान्यसाठा लपवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रिचर्ड गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रमिजराजा अतार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाई दरम्यान यासिर सादिक तांबोळी (वय २६, रा. सोनगाव साकळ, ता. राहुरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील गोदामाची तपासणी केली असता रेशनिंगचा गहू व तांदूळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आढळून आला.
पोलिसांनी ६९० पोती गहू (सुमारे ११,६४० किलो) व ५८० पोती तांदूळ (सुमारे ८,५६० किलो) असा एकूण २१,५४० किलो धान्यसाठा जप्त केला. याशिवाय दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख २ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, लेखनिक पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास साळवे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.