राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –
राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात तनपुरे यांनी म्हटले आहे की, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींमुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही समस्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गंभीर बनली असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट ओढवते. अशा कुटुंबांना शासनाकडून सध्या एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, सन २००१ पासून या मदतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक लाख रुपयांची मदत अपुरी ठरत असल्याने ती वाढविण्याची गरज असल्याचे तनपुरे यांनी नमूद केले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मंजूर करताना होणारा विलंब टाळण्यासाठी जिल्हानिहाय प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम किमान पाच लाख रुपये करण्यात यावी, तसेच संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याबाबत प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.