देवळाली प्रवरा : शासकीय जागेवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी बिरोबावाडी परिसरात तिसरी घोंगडी बैठक आयोजित केली. या बैठकीत नागरिकांना शासन निर्णयातील तरतुदी समजावून सांगत त्याचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्य शासनाने २५ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयाची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने देवळाली प्रवरा शहरात विविध भागांत जनजागृती अभियान राबविले जात असल्याचे ढूस यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ढूस म्हणाले, की शासन निर्णयानुसार अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच मुदत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शासनाच्या या निर्णयाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी नगरपरिषदेनेही पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी प्रसादनगर आणि बाबुराव पाटील महाराज वसाहत येथे दोन घोंगडी बैठका घेण्यात आल्या असून बिरोबावाडीतील ही तिसरी बैठक होती. आगामी काळातही शहरातील विविध भागांत अशाच बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीस अब्बास अल्लाबक्ष शेख, युनुस अल्लाबक्ष शेख, अन्सार रसुलभाई शेख, इस्माईल रसुलभाई शेख, गोरख गवारे, किशोर ताजने, गणेश औटी, मुकेश डांगे, सचिन रसाळ, ज्ञानेश्वर लोळगे, अशोक कीर्तने, प्रताप पाळंदे, संतोष आढाव, रावसाहेब तागड, संजय बारसे, राजेंद्र बारसे, जयेश हरणासकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.