जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल लॉयरपदी अँड. प्रकाश संसारे यांची नियुक्ती

राहुरी, दि. ७ ,वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे – अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील ज्येष्ठ विधीज्ञ व नोटरी पब्लिक अँड. प्रकाश संसारे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पॅनल लॉयर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राहुरीच्या विधी क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.अँड. संसारे हे गेल्या २६ वर्षांपासून राहुरी तसेच अहिल्यानगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. विविध प्रकारच्या तसेच अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम करत आपल्या विधी कौशल्याची छाप उमटवली आहे. कायद्याचा सखोल अभ्यास, प्रभावी युक्तिवाद आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.सर्वसामान्य, गरजू व वंचित नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यांच्या या दीर्घ अनुभवाची आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.या नियुक्तीबद्दल राहुरी शहरासह तालुक्यातील वकील बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतील नागरिकांकडून अँड. प्रकाश संसारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळात अधिकाधिक गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *