राहुरी तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान; सरसकट पंचनाम्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) – राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मल्हारवाडी, काळे आखाडा, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, चिंचाळे, गाडकवाडी, म्हैसगाव, शेरी चिखलठाण, कोळेवाडी, दरडगावथडी आदी गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार तथा जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी बाधित भागांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गारपिटीमुळे उभ्या पिकांचे, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.या नुकसानीची गंभीर दखल घेत अक्षय कर्डिले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री विखे पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ आदेश देत नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले.प्रशासनाकडून पंचनामे जलदगतीने पूर्ण करून शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *