१७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी प्रा.डॉ.संदीप सांगळे

अहिल्यानगर ( प्रतिनिधी ): शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मे २०२६ मध्ये होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली. 

     शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जाधव लॉन्स, अहिल्यानगर येथे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.साहेबराव ढमढेरे आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, तळेगाव ढमढेरे या ठिकाणी कार्यरत असलेले डॉ.संदीप सांगळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून  त्यांचे एकूण बारा पुस्तके प्रकाशित आहेत.त्यामध्ये कथाकार शंकरराव खरात, मध्ययुगीन मराठी संत कविता:सामाजिक व वाड्मयीन मूल्यमापन,आधुनिक मराठी साहित्य:स्वरूप आकलन व आस्वाद,मराठी वाड्मय तंत्र:स्वरूप व आकलन,संत सोयराबाई:व्यक्तित्व व कर्तृत्व,रूप कवितेचे (संपादन),गीतमाला (संपादन),लोकाविष्कार(संपादन),यशोगाथा:एक परिक्रमा संपादन), व्यावहारिक उपयोजित मराठी आणि प्रसार माध्यमांची कार्यशैली अशी पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांचे सहा महत्त्वाचे रिसर्च पेपर नॅशनल लेव्हलवर प्रसिद्ध झालेले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा विद्यार्थ्यांनी पीएचडी तर 12 विद्यार्थ्यांनी 12 एमफिल  केलेली आहे.

   प्रा.डॉ.संदीप सांगळे यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार,पद्मगंगा पुरस्कार, सकाळ एक्सलन्स अवॉर्ड,मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्यगौरव पुरस्कार,अक्षर गौरव साहित्य पुरस्कार,डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार,उपक्रमशील शिक्षक पुरस्कार,राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार,पद्मश्री पु.ल.देशपांडे मुक्तांगण आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार,आद्य क्रांतिकारक गुरु लहुजी वस्ताद साळवे समाज सन्मान पुरस्कार यासह विविध साहित्यिक पुरस्कार मिळालेले आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषद कर्जत शाखा व ज्ञान प्रबोधिनी ग्रामविकास प्रतिष्ठान,पुणे चे अध्यक्ष आहेत. विविध ठिकाणी आयोजित साहित्यिक उपक्रमामध्ये ते सातत्याने सहभागी असतात म्हणून त्यांची सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,त्यांच्या निवडीबद्दल शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सोळाव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष,नगरसेवक संपतदादा बारस्कर,माजी संमेलनाध्यक्ष डॉ.संजय कळमकर,मा.आ.लहू कानडे, खजिनदार भगवान राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *