महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव

अहिल्यानगर  प्रतिनिधी : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात प्रत्येक तालुक्यातील एका महिला सामाजिक कार्यकर्ती अथवा महिला साहित्यिकांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

जाधव लॉन्स, अहिल्यानगर येथे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीस कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक सुनील गोसावी, संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, राहाता पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष ब्राह्मणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शब्दगंध साहित्यिक परिषदेकडून जिल्हाभरातील  प्रत्येक तालुक्यात शाखा कार्यरत असून संबंधित शाखांकडून महिला कार्यकर्त्या व साहित्यिकांची नावे मागविण्यात येणार आहेत. संयोजन समिती त्या नावांचा विचार करून निवडक महिलांचा विशेष सन्मान करणार आहे.

बैठकीत संमेलनाच्या नियोजनाबाबत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पोस्टर स्पर्धा, स्टँड-अप कॉमेडी शो / फार्स आयोजित करणे, तसेच राहाता तालुका कार्यकारी मंडळास मंजुरी देण्यात आली. नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून नवोदित कवींकरिता स्वतंत्र ‘कवी कट्टा’ उभारून त्यांना कविता सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच 2025 मधील पुस्तकांच्या निकालास मंजुरी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत झालेल्या 16 साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे एकत्रित पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असून त्याचे संपादन सुनील गोसावी करणार आहेत.

यावेळी तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाथर्डी यांना 215 पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रबोधिनी पठाडे, ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र फंड, जिल्हास्तरीय महिला गुणगौरव पुरस्कार प्राप्त शर्मिला गोसावी तसेच राहाता तालुका शाखेचे अध्यक्ष साहेबराव तुपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बैठकीत राम पठाडे, राजेंद्र चोभे पाटील, बाळासाहेब शेंदुरकर, मकरंद घोडके, सुनील कटारिया, ज्ञानदेव पांडुळे, प्रबोधिनी पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रा. डॉ. अनिल गर्जे, स्वाती ठुबे, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, स्वाती अहिरे, रूपचंद शिदोरे, बाळासाहेब देशमुख, सुरेखा घोलप, मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, सुमेध ब्राह्मणे, प्रा. गिरीश सोनार, श्यामा मंडलिक, रामदास कोतकर, प्रमोद येवले यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *