राहुरी: प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडून मुख्याध्यापक पदासाठी सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेस अनु.जा.विभागाचे तालुकाध्यक्ष संजय संसारे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी दि.17 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शिक्षण विभागाने नुकतेच मुख्याध्यापक पदोन्नतीस पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली असून, पदोन्नती प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी पाच राज्यांसह राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी, अहिल्यानगर शहराचा काही भाग तसेच पाथर्डी तालुक्याचा काही भाग समाविष्ट आहे. मुख्याध्यापक पदे ही लाभाची पदे असल्याने आचारसंहितेच्या कालावधीत अशा पदांवर पदोन्नती देणे नियमबाह्य ठरते, असा दावा संसारे यांनी केला आहे.यामुळे संबंधित पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.