मध्यवर्ती बाजारपेठेत धोकादायक वीज पोल; दुर्घटनेची भीती, रस्ता रोकोचा इशारा

राहुरी वेब प्रतिनिधी,१२ (शरद पाचारणे ) : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात वीज विभागाचा पोल तिरपा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा पोल अधिकच झुकत चालला असून कोणत्याही क्षणी तो कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने नागरिक, व्यापारी व भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून काहींनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.राहुरी शहरातील वर्दळीच्या बाजारपेठेतील जैन स्थानक परिसरात असलेला वीज विभागाचा लाईट पोल अचानक रस्त्याकडे तिरपा झाला आहे. हा पोल थेट रस्त्याच्या दिशेने झुकल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांनी या प्रकाराबाबत महावितरण विभाग, राहुरी नगरपालिका, रोषणाई विभाग तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आहे.मात्र आठ दिवस उलटूनही हा पोल अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. उलट दिवसेंदिवस तो अधिकच झुकत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात जैन स्थानक, जैन मंदिर, राहुरीचे पोस्ट ऑफिस तसेच शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते.सध्या जैन समाजाच्या गणगौर मिरवणुकीचे कार्यक्रमही या भागात सुरू आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी येथे होत आहे. याशिवाय पोल तिरपा झाल्यापासून परिसरातील स्ट्रीट लाईटही बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन पोल दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *