श्रीरामपूर वेब प्रतिनिधी : अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे गोळा करणाऱ्या ‘ग्रो- इन्व्हेस्टर’ नावाच्या कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईमुळे अनेक ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. त्यामुळे संभाव्य मोठी फसवणूक टळल्याची माहिती पोलिसांनी दिली.अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून काही कंपन्यांकडून नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशाच प्रकारे ‘ग्रो- इन्व्हेस्टर’ कंपनीकडून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून रक्कम गोळा केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवार परिसरात छापा टाकून कारवाई केली.या कारवाईदरम्यान संदीपराज मोहिणीबाई कपाटे (वय २६, रा. हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपूर) याच्याकडून नागरिकांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून एक लॅपटॉप, संगणक स्क्रीन, चेकबुक, कॅश काउंटिंग मशीन, विविध कागदपत्रे तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कारवाईच्या भीतीने काही ठेवीदारांचे पैसे परत केल्याचेही पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी परत करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.दरम्यान, नागरिकांनी मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीकडे अधिकृत परवाना आहे का याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.