राहुरीत वर्धमान ज्वेलर्स चोरी प्रकरण; पाच लाखांचे सोन्याचे दागिने फिर्यादी भन्साळी यांना परत

राहुरी वेब प्रतिनिधी,१६ मार्च ( शरद पाचारणे ) : येथील वर्धमान ज्वेलर्स दुकान फोडून झालेल्या चोरी प्रकरणातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राहुरी पोलिसांनी जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीच्या ताब्यात परत दिले आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पाच ते १४ जुलै रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स दुकानाचे शटरचे सेंटर लॉक हत्याराच्या साहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सुमारे ६० लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच डीव्हीआर चोरी करून नेले होते. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची जबाबदारी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपविली.पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, पोहेकॉ सूरज गायकवाड, राहुरी यादव, विकास साळवे,प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे व गणेश लिपणे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी व अतुल सुरेश खंडागळे (दोघेही रामटेकडी, हडपसर, पुणे) यांच्यासह अन्य साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.तपासादरम्यान आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीतील एकूण ४ लाख ९५ हजार २६९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये २२ कॅरेटचे मिनी गंठण पोत व सोन्याचा लगड तुकडा असा मुद्देमाल आहे.दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, राहुरी यांच्या आदेशानुसार हा जप्त मुद्देमाल फिर्यादी सौरभ राजेंद्र भन्साळी (रा. अनिल तनपुरे कॉलनी रोड, राहुरी) यांच्या ताब्यात देण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *