तांदुळवाडी येथे नवनाथ ग्रंथ पारायण, अखंड हरिनाम सप्ताह व संन्यास दीक्षा सोहळ्याचे आयोजन

राहुरी वेब प्रतिनिधी – राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील गुरु गोरक्षनाथ बहुउद्देशीय संस्थान, गोरक्षनाथ मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हभप धोंगडे गुरुजी यांच्या प्रेरणेने दि. 26 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत नवनाथ ग्रंथ पारायण, अखंड हरिनाम सप्ताह तसेच संन्यास दीक्षा समारोह संपन्न होणार असल्याची माहिती हभप गितामाई धसाळ यांनी दिली आहे.या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8 ते 11 ग्रंथ वाचन, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सप्ताहादरम्यान हभप आदिनाथ महाराज दुशिंग, हभप स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज, हभप कैलासगिरी महाराज, हभप महंत आदिनाथ महाराज शास्त्री, हभप महंत अर्जुन महाराज तनपुरे, हभप पंडित महाराज भुतेकर, हभप अरुणनाथ गिरीजी महाराज तसेच श्री महामंडलेश्वर अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांची कीर्तने होणार आहेत.दि. 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता नवनाथ ग्रंथ व प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सप्ताहाची सांगता दि. 2 एप्रिल रोजी हभप गीतामाई धसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.याशिवाय दि. 30 व 31 मार्च रोजी हभप महंत भास्करगिरीजी महाराज, श्री श्री महंत शंकरानंद सरस्वती, श्री श्री महंत गणेशानंद सरस्वती, स्वामी श्री गोपालानंद सरस्वती तसेच हभप महंत प्रकाशानंद गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हभप गीतामाई धसाळ यांचा संन्यास दीक्षा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यानंतर त्यांना ‘साध्वी गीतानंद सरस्वती’ या नावाने ओळखले जाणार आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी तांदुळवाडी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुरु गोरक्षनाथ बहुउद्देशीय संस्थान व हभप गीतामाई धसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *