राहुरी वेब प्रतिनिधी,७ मार्च (शरद पाचारणे) : राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राहुरी मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या निधीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला आहे.मतदारसंघातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना या निधीतून मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अर्थसंकल्पातून खालील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे –
राहुरी – बारागाव नांदूर – वावरथ – ढवळपुरी (प्रजीमा २१७) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण – ३ कोटी रुपये
ताहाराबाद – राहुरी – सोनई (रामा ६६) रस्त्यात सुधारणा – ४ कोटी रुपये
प्ररामा ८ ते वांबोरी – खोसपुरी – मिरी – माका (रामा ५२) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण – ३.५ कोटी रुपये
प्रजीमा ४५ ते पिंपळगाव उज्जैनी – ससेवाडी (प्रजीमा १७८) मजबुतीकरण व डांबरीकरण – २.५ कोटी रुपये
पांढरी पुल – मिरी – शेवगाव (रामा ५२) मिरी ते बेलाचे झाड रस्ता सुधारणा, ता. पाथर्डी – २.५ कोटी रुपये
पांढरी पुल – मिरी – शेवगाव (रामा ५२) पांगरमल ते शिंगवे केशव रस्ता सुधारणा – २.५ कोटी रुपये
मिरी ते घोडेगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण – ३ कोटी रुपये
लोहसर ते राघू हिवरे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण – ३ कोटी रुपये
अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरावस्था
अक्षय कर्डिले म्हणाले, की मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली होती. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीही या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर खासदार सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना लवकरच वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांचे अक्षय कर्डिले यांनी आभार मानले आहेत.दरम्यान, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.