शिर्डी दि.5 नोव्हेंबर 26: श्रद्धा आणि सबुरीच्या जोरावर तब्बल वीस वर्षे सुरू असलेल्या कामगारांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्याच्या न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण आले आहेत. या निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळ्यात जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांचे अभिनंदन केले. मात्र, या यशासोबतच तुमची जबाबदारीही वाढली आहे. साईभक्तांचे स्वागत, सुरक्षा आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य द्या, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला.
शिर्डी संस्थानमधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कामगार पतपेढीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, कामगारांचा हा वीस वर्षांचा संघर्ष होता. मात्र, सर्व कामगारांनी एकजूट आणि विश्वास कायम ठेवला, हीच या यशाची खरी ताकद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे निर्णय मार्गी लागला. अनेकांनी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्रावर विश्वास ठेवून कामगारांनी आपला लढा सुरू ठेवला.
यापूर्वी १ हजार ५२ कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात झाला होता. त्या निर्णयासाठी स्व. जयंतराव ससाणे आणि आपण पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता ४८८ कामगारांच्या प्रश्नालाही न्याय मिळाला आहे. जिथे प्रामाणिकपणे काम करण्याची भावना असते, तिथे साईबाबांचा आशीर्वाद लाभतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिर्डीसाठी कोणताही निर्णय घेताना आपण कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. वाडवडिलांकडून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून काम करत राहिलो. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करायची; मात्र जनतेशी प्रतारणा करायची नाही, हीच भूमिका कामगारांच्या प्रश्नातही कायम ठेवली, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्याने आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. देशभरातून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना मिळणारी सेवा, त्यांचे स्वागत, सुरक्षितता आणि स्वच्छता यावर शिर्डीचा नावलौकिक अवलंबून आहे. देशात अनेक आध्यात्मिक स्थळे विकसित होत असल्याने शिर्डीचे वेगळेपण जपण्याचे आव्हान कामगारांनी स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिर्डी परिसरातील विमानतळ आणि बाह्यवळण रस्त्यासारख्या विकासकामांचा उल्लेख करताना विकासाच्या कामांमध्ये अनेक अडचणी आणि टीका सहन करावी लागली; मात्र आज या कामांचे महत्त्व सर्वांना पटत आहे. निळवंडेचे पाणी आल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही दिलासा देता आला, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात, अनेक वर्षांपासून होत असलेल्या आरोपांना आणि टीकेला आज पूर्णविराम मिळाला असून हा शब्दपूर्तीचा दिवस असल्याचे सांगितले. विखे परिवाराला जनतेने दिलेल्या प्रेमाची उतराई करण्याचे काम आम्ही करत आहोत. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कामगारांनी दाखवलेल्या विश्वासाचे फळ आज त्यांना मिळाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि विठ्ठलराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.