चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया! तीन रुग्णांना आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार

अहिल्यानगर : चेहऱ्याच्या गंभीर दुखापतींमुळे बोलणे, अन्न चावणे, जबड्याची हालचाल तसेच चेहऱ्याच्या नैसर्गिक रचनेवर परिणाम होऊ शकतो. अशा गुंतागुंतीच्या दुखापतींवर डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्लास्टिक सर्जरी विभागाने तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही रुग्णांवर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

या तिन्ही रुग्णांच्या चेहऱ्याच्या हाडांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या गंभीर दुखापती झाल्या होत्या. एका रुग्णाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूच्या वरच्या जबड्याचे (Maxilla), खालच्या जबड्याचे (Mandible) आणि गालाच्या हाडाचे (Zygomatic Bone) फ्रॅक्चर झाले होते. तर दुसऱ्या रुग्णाच्या खालच्या जबड्याचे आणि तिसऱ्या रुग्णाच्या गालाच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले होते. प्रत्येक रुग्णाच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात घेऊन डॉक्टरांनी स्वतंत्र उपचारांचे नियोजन केले.

या शस्त्रक्रियांसाठी ORIF (Open Reduction and Internal Fixation) या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या तंत्रामध्ये फ्रॅक्चर झालेली हाडे योग्य स्थितीत आणून विशेष वैद्यकीय प्लेट्स आणि स्क्रूच्या साहाय्याने स्थिर केली जातात. त्यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक ठेवण, दातांची जुळणी आणि जबड्याची कार्यक्षमता पूर्ववत करण्यास मदत होते.

प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजित काळे, डॉ. धीरज जुमडे आणि डॉ. अश्विन वानखेडे यांनी या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण नियोजनातून तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.
चेहऱ्याच्या हाडांच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियांसाठी विशेष वैद्यकीय उपकरणे, साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. अशा महागड्या उपचारांचा आर्थिक भार या तिन्ही रुग्णांना सहन करावा लागला नाही. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आणि वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात विशेष वैद्यकीय सेवांचे बळकटीकरण केले जात आहे.
चेहऱ्याच्या गंभीर दुखापतींवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा अहिल्यानगरमध्येच उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील ही वैद्यकीय सुविधा महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *