सुरेश वाबळे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांश वाटप; आर्थिक शिस्त आणि आधुनिक बँकिंग सुविधांवर भर
राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे: प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीने दिवाळीनिमित्त सभासदांना लाभांश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेरणा पतसंस्था आणि प्रेरणा मल्टिस्टेटने प्रत्येकी ११ टक्के, तर प्रेरणा सोसायटीने ७ टक्के लाभांश जाहीर केला.
यावेळी बोलताना सुरेश वाबळे पाटील म्हणाले की, प्रेरणा पतसंस्था, प्रेरणा मल्टिस्टेट आणि प्रेरणा सोसायटी या तिन्ही संस्था स्थापनेपासून सातत्याने सभासदांना दिवाळीच्या निमित्ताने लाभांश देत आहेत. खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर असून आर्थिक शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. सभासदांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या हितसंबंधांना संस्थेत नेहमीच प्राधान्य दिले जाते. आम्ही केवळ विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार चळवळीमुळे सभासदांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला असून रोजगार आणि व्यापाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. परिसराच्या आर्थिक विकासात सहकारी पतसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच सोने तारण कर्जासाठी केवळ सोनारांवर अवलंबून न राहता संस्थेने आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी १५४ कोटी रुपये असून कर्ज वितरण ९९ कोटी रुपये झाले आहे. प्रेरणा मल्टिस्टेटने १०२ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून ७३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. या दोन्ही संस्थांनी ११ टक्के लाभांश जाहीर केला आहे. तर प्रेरणा सोसायटीने ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे.
यावेळी कृषी शास्त्रज्ञ शेतकरी मंच, कृषी विद्यापीठ व कृषी खाते महाराष्ट्र शासन यांच्या प्रथम अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सतीश राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे, प्रेरणा सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक उर्हे, संचालक विष्णुपंत वर्पे, शिवाजी उर्हे, श्रीकांत जगधने, रावसाहेब शिंदे, वसंत कोळसे, अशोक सौदागर, राजेंद्र गांडुळे, रवींद्र राऊत, अशोक ओहोळ, बाळासाहेब वाबळे, बबन नाना कोळसे, भाऊसाहेब चंद्रे, जगन्नाथ वर्पे, संजय शिंदे, भास्कर इरुळे, भानुदास चंद्रे, सोपान पठारे, भाऊसाहेब कोळसे, भाऊसाहेब उर्हे, भाऊसाहेब वर्पे यांच्यासह जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वर्पे आणि सचिव दीपक सौदागर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. वेणुनाथ लांबे यांनी मानले.