राहुरी व प्रतिनिधी, शरद पाचारणे-
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अनेक नेते मतमोजणी केंद्रावर उपस्थित असताना, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे मात्र विजयाचा जल्लोष बाजूला ठेवून थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
जिल्हा बँकेच्या राहुरी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ८९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना १८ मते मिळाली.
एकीकडे मतमोजणी केंद्रावर विजयाचा गुलाल उधळला जात होता, जल्लोष सुरू होता; तर दुसरीकडे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मतमोजणी केंद्राकडे पाठ फिरवत राहुरी तालुक्यातील दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्याला प्राधान्य दिले.
वाबळेवाडी, वरशिंदे परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली वणवण त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. तहानलेल्या गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
एका बाजूला विजयाचा गुलाल, फटाक्यांचा जल्लोष आणि राजकीय आनंदोत्सव सुरू असताना, दुसऱ्या बाजूला दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेण्याचा मार्ग आमदार तनपुरे यांनी निवडला.
निवडणुकीतील विजयापेक्षा जनतेच्या प्रश्नांना मोठे मानणाऱ्या त्यांच्या या भूमिकेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा तहानलेल्या माणसाला पाणी मिळवून देणे महत्त्वाचे मानणाऱ्या आमदारांच्या या कृतीचे शेतकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.