आमदार अक्षय कर्डिले यांच्या दमदार पाठपुराव्याला यश; आमदार प्रसाद लाड यांची साथ, रखडलेल्या रस्त्यांचा मार्ग मोकळा
अहिल्यानगर-
पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेल्या पाठपुराव्याला आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या खडीकरण आणि डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्याच टप्प्यात मंजूर झालेल्या या निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. लोकनेते स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार प्रसाद लाड यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पाथर्डी तालुक्याशी जावई म्हणून त्यांचे असलेले नाते आणि प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी मांडलेले रस्त्यांचे प्रश्न यामुळे या भागातील विकासकामांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावेळी रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आमदार लाड यांनी दिला होता. निवडणुकीनंतर आमदार अक्षय कर्डिले यांनीही हा विषय गांभीर्याने घेत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, पहिल्या टप्प्यात तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी घेतलेला पुढाकार आणि पाथर्डी तालुक्यातील प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता या निधीमंजुरीतून अधोरेखित होत आहे. केवळ आश्वासनांपुरता विषय न ठेवता रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या निधीतून विविध गावांतील खराब रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, प्रवासातील अडचणी आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांपासून नागरिकांची सुटका होण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनातून हा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांसाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सहसरचिटणीस कुशल भापसे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. लवकरच संबंधित रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
१० कोटींवरच विकासाची गाडी थांबणार नाही
रस्त्यांच्या कामांसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी पाथर्डी तालुक्यातील विकासकामांसाठी पुढील टप्प्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी, तर तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज रस्ता मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे कुशल भापसे यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यांबरोबरच धार्मिक आणि महत्त्वाच्या मार्गांच्या विकासालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.एकीकडे निवडणुकीत दिलेला शब्द आणि दुसरीकडे त्याच्या पूर्ततेसाठी झालेला पाठपुरावा, यामुळे आमदार अक्षय कर्डिले यांच्या विकासकामांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंजूर झालेला १० कोटींचा निधी हा केवळ आकडा नसून, अनेक गावांच्या दळणवळणाच्या आशा उंचावणारा निर्णय ठरणार आहे.