बुऱ्हानगरमध्ये देवीच्या ज्योतींचे उत्साहात स्वागत; आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती

पंचक्रोशीतील गावांची धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा उपक्रम

बुऱ्हानगर : नगर तालुक्यातील आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुऱ्हानगर येथे नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून आणलेल्या देवीच्या ज्योतींचे आमदार अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची विधिवत महाआरती करण्यात आली.
कापूरवाडी, वारूळवाडी, नागरदेवळे, बुऱ्हानगर आणि आगडगाव यांसह पंचक्रोशीतील विविध गावांतील युवकांनी पुढाकार घेत देवीच्या ज्योती मंदिरात आणल्या. कोल्हापूरची देवी, निघोजची मळगंगा देवी, आई तुळजाभवानी आणि मोहटादेवी यांसह विविध देवींच्या मंदिरांतून आणलेल्या ज्योतींच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. महाआरतीनंतर मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. युवकांनी एकजुटीने या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतल्याने नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढला.
यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, “आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून बुऱ्हानगरची संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून देवीच्या ज्योती आणण्याची परंपरा ही आपल्या धार्मिक एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.”
देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस लाभोत आणि सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी समृद्ध होवोत, अशी प्रार्थनाही आमदार कर्डिले यांनी यावेळी केली.
देवीच्या ज्योतींचे स्वागत, महाआरती आणि घटस्थापनेच्या निमित्ताने बुऱ्हानगरसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या उपक्रमातून धार्मिक एकात्मता जपत परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *