श्रीरामपूर : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात स्कूल बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशानुसार तसेच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि श्रीरामपूर शहर वाहतूक शाखेने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. बुधवारी (ता. ३) सकाळी ७.३० ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनांची वाहन नोंदणी, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तसेच वाहनातील सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही-जीपीएस सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची भूमिका आदी बाबींचीही तपासणी करण्यात आली.
यावेळी चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तो मद्य अथवा अन्य अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवित आहे का, तसेच वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे का, धोकादायक पद्धतीने वाहन चालविले जात आहे का, याचीही विशेष पाहणी करण्यात आली.
या मोहिमेत लायसन्स नसणे, पीयूसी नसणे, चालकाचा गणवेश नसणे, अतिरिक्त प्रवासी, फायर बॉटल, प्रथमोपचार पेटी, फिटनेस, आपत्कालीन एक्झिटची सुविधा नसणे तसेच सेफ्टी काचा व जाळीबाबतच्या नियमांचे उल्लंघन अशा विविध कारणांवरून कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी ही केवळ पोलीस प्रशासनाची नसून स्कूल बस चालक, वाहनमालक, शाळा प्रशासन आणि पालकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन करण्यात आले. काही वाहनचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत समज देण्यात आली असून, भविष्यातही अशा प्रकारची विशेष तपासणी मोहीम अधिक सतर्कपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.