स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने देवळाली प्रवरा येथे भव्य क्रीडा संकुल उभारावे ढुस यांची मागणी

देवळाली प्रवरा : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे बालपण देवळाली प्रवरा शहरात गेले. या भूमीशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या असल्याने त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी त्यांच्या नावाने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत सर्व सुविधांनी युक्त भव्य क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी नगरसेविका पल्लवी वैभव ढुस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शिर्डीकडून नगरकडे जात असताना सुनेत्राताई पवार या राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा शहराच्या वतीने सुनेत्राताईंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच वैभव ढुस लिखित ‘अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी नगरसेविका पल्लवी ढुस यांच्या वतीने क्रीडा संकुलाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात पल्लवी ढुस यांनी म्हटले आहे की, देवळाली प्रवरा शहराशी स्व. अजितदादा पवार यांचे बालपणापासूनचे ऋणानुबंध आहेत. येथील मातीत त्यांनी बालपणी खेळत-बागडत वेळ घालवला आहे. त्यांच्या स्मृतींचा ठेवा जपण्यासाठी त्यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारणे ही शहरवासीयांची भावना आहे. ही मागणी त्यांचे सासरे तथा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढुस यांच्यासह नागरिकांची असल्याचे त्यांनी नमूद केले.

इनडोअर गेमसह विविध सुविधा

प्रस्तावित क्रीडा संकुलात सर्व प्रकारचे इनडोअर गेम, जॉगिंग ट्रॅक, क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांसाठी भव्य मैदानासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. या संकुलामुळे देवळाली प्रवरा येथे जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येईल. त्यामुळे शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

दोन जागांचे प्रस्ताव

क्रीडा संकुलासाठी दोन जागांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यामध्ये प्रसादनगर भागातील महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या मालकीची गट क्रमांक ५४४, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५ व ७७६ या गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या दगडखाणीच्या जागेचा समावेश आहे. ही जागा घरकुल, क्रीडा संकुल, विविध महापुरुषांची स्मारके व उद्यानासाठी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जागा हस्तांतरणाची कार्यवाही सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे.

दुसरा प्रस्ताव शहरालगत ग्रामसुधारणा मंडळाकडील व नगरपरिषदेच्या ताब्यात असलेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तलावाच्या जागेचा आहे. विकास आराखड्यातील वॉटर टँकचे आरक्षण बदलून तेथे ‘स्व. अजितदादा पवार क्रीडा संकुल’ असे आरक्षण टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

वरीलपैकी उपलब्ध जागेत अथवा नगरपरिषद सुचवेल त्या जागेत क्रीडा संकुल उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित विभागांना आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी पल्लवी ढुस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *