कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेत सुसूत्रता आणा –ना. विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : प्रतिनिधी 

कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणून ती सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह आठही जिल्ह्यांतील जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी सहभागी झाले.

डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत उपलब्ध नोंदी व कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीची वंशावळ तसेच सादर केलेल्या पुराव्यांची सुसंगती स्पष्टपणे तपासावी. महसुली कागदपत्रे, शैक्षणिक पुरावे तसेच इतर उपलब्ध अभिलेखांच्या आधारे वंशावळ निश्चित करण्याची कार्यवाही सुसूत्रपणे करावी. नागरिकांकडून नियमानुसार आवश्यक तीच कागदपत्रे मागवून प्रक्रिया सुलभ ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

वंशावळ निश्चित करताना मोडी लिपीतील नोंदी, जुन्या अभिलेखांमधील नोंदी, आडनाव नसलेल्या अभिलेखांबाबत तसेच स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. मोडी लिपीतील नोंदींचे तज्ज्ञांकडून भाषांतर करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर जिल्ह्यांमध्ये किंवा शेजारील गावांमध्ये संबंधित नोंदी उपलब्ध असल्यास तेथील अभिलेखांचा संदर्भ घेऊन वंशावळ व नातेसंबंधाची खातरजमा करण्याची कार्यपद्धती स्पष्ट ठेवावी, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अधिक समन्वय ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आलेली संबंधित कागदपत्रे जात वैधता समितीला उपलब्ध करून देत दोन्ही प्रक्रियांमध्ये अधिक समन्वय साधावा. ऑनलाइन प्रक्रियेचा प्रभावी वापर करून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल, यासाठी कार्यपद्धती अधिक सुलभ करावी. विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरांच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्राची कार्यवाही सुलभ करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत विविध प्रकरणांच्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. जुन्या अभिलेखांतील नोंदी, त्यांचे भाषांतर तसेच उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे वंशावळ निश्चित करण्याच्या प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आवश्यकतेनुसार मूळ अभिलेख मागवून त्याची पडताळणी करून तसेच तज्ज्ञांकडून भाषांतराची खातरजमा करून नियमानुसार प्रकरणांचा निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेची स्पष्ट माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही डॉ. विखे पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *