श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीरामपूर शहर व परिसरातील शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांतील तब्बल ५१८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना मीनाताई जगधने म्हणाल्या, “नशामुक्त भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणारे उपक्रम अत्यावश्यक आहेत.” विद्यार्थ्यांनी अशा अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी पोलिस विभागाकडून नशामुक्त भारत अभियानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शाळा-महाविद्यालयांचे स्वागत केले.
इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्त कुटुंब, सुखी कुटुंब’, ‘व्यसनमुक्त भारत, निरोगी भारत’, ‘नशामुक्त समाज, काळाची गरज’ आणि ‘नशामुक्त शाळा, सुरक्षित विद्यार्थी’ या विषयांवर निबंध लेखन घेण्यात आले. दहावी ते महाविद्यालयीन गटासाठी ‘व्यसनास नकार, जीवनास होकार’, ‘व्यसनाचे दुष्परिणाम आणि उपाययोजना’, ‘व्यसनमुक्ती समाजाची सामूहिक जबाबदारी’, ‘व्यसनमुक्त भारतासाठी माझे योगदान’ आणि ‘व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज’ या विषयांचा समावेश होता.
स्पर्धेचे संयोजन डी.डी. काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी केले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन, पोलिस निरीक्षक शीतल मुगडे, पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पौर्णिमा गुजर यांनी केले, तर आभार डॉ. संतोष घंगाळे यांनी मानले.
चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धाही होणार
अभियानांतर्गत १९ ऑगस्टला डी.डी. काचोळे विद्यालयात चित्रकला स्पर्धा, तर २० ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी एस.के. सोमय्या शाळेत रांगोळी स्पर्धा होणार आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता आर.बी.एन.बी. कॉलेज मैदान येथून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत नागरिकांसह शाळा, विद्यालये व महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.