राहुरीतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात निलेश शिरसाठ आक्रमक

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश शिरसाठ यांनी राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सांडपाणी भूमिगत गटार योजनेची कामे करण्यात आली. मात्र, कामानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे व कपारी निर्माण झाल्या आहेत. परिणामी नागरिक, महिला तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे.
सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून चिखलाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने त्वरीत कामाला सुरुवात न केल्यास शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांसह मुख्याधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निलेश शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *